गुरुवार, २१ जुलै, २०११

मन भावना...

     कोणतेही काम करतांना, कोणताही निर्णय घेतांना अगोदर आपण डोक्याने विचार करतो. नेहमीच आपण सगळ्या शक्यता तर्काच्या कसोटीवर जोखून पाहतो. त्या गोष्टीच्या नफा नुकसानीचा विचार करतो, त्यानंतर त्या बाबतीतला निर्णय घेतो पण तो घेतल्यावरही आपला मेंदू स्वस्थ बसत नाही परत शंका कुशंका आपल्या डोक्यात येतात आणि आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडवतात. म्हणजे काय होते, विचार डोके करते आणि शिक्षा बिचाऱ्या मनाला भोगावी लागते, त्यात त्याचा दोष नसतांना !!! म्हणून मला असे वाटते कि, आपण नको एवढे महत्व डोक्यालाच न देता थोडा मनालाही भाव द्यावा कारण आपलं मन वेळोवेळी आपल्याला भल्या बु-याची जाणीव करून देतच असते ना. पण आपण मनाचे सल्ले नेहमीच भावनिकता म्हणून बाजूला सारून तर्काधिष्ठित निर्णय घेण्यातच धन्यता मानत असतो...

डोक्यानेच विचार करू नये
कधी मनालाही वाव द्यावा,
गणिती हिशेब बाजूला ठेवून
भावनांनाही भाव द्यावा....

बुधवार, २० जुलै, २०११

प्रेमाची बेरीज...

     प्रेमाच्या विश्वातल्या संकल्पना आणि गणित  काही तरी औरच!!! भूमिती मध्ये एकरूपता नावाचा एक प्रकार असतो, त्यात काही ठराविक रेषा काही रेषांची आणि काही कोन काही कोनांशी एकरूप असतात पण प्रेमाच्या भूमितीतही ही एकरूपता प्रकर्षाने जाणवते. तो आणि ती दोघे एकमेकांना अनुरूप असले की मग ते एकरूप होतात.आणि इतके एकरूप होतात की अगदी एकरूप होतात. प्रेमाच्या या गणितात बेरीज आणि वजाबाक्याही  अशाच काहीशा सारख्या काहीश्या वेगळ्या... प्रेमाच्या बेरजेत एक तो आणि एक ती मिळून दोन हे उत्तर येत नाही तर उत्तर एकच येते आणि वजाबाकीत दोघांपैकी एकजरी दुसऱ्याला सोडून गेला तर मात्र उत्तर शून्य येते म्हणजे बाकी काही शिल्लकच राहत नाही..!!! सगळं काही संपून जातं.

प्रेमाची अनोखी बेरीज
एक आणि एक मिळून एकच होते,
दोघांमधून एक गेल्यास
वजाबाकी मात्र शून्य येते...!!!!

मंगळवार, १९ जुलै, २०११

दिसतं तसं नसतं...

    आपले डोळे आपल्याला जे दाखवतात ते आणि तेवढेच आपण बघतो अन तेच सत्य तेच खरे असे आपण मानतो. पण बऱ्याचदा हे डोळे आपली बेमालूम फसवणूक देखील करतात, मग आपण म्हणतो माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नाही..! म्हणून नेहमीच डोळ्यांवर १०० टक्के विश्वास कधीच टाकू नये ? दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी असतातच असे नाही आणि असणाऱ्या सगळ्या गोष्टी दिसतीलच असेही नाही. क्षितीज डोळ्यांना दिसते, मृगजळ डोळ्यांना दिसते पण मुळात ते अस्तित्वात असत नाही, आणि परमेश्वर, आपली बुद्धी दिसत नाही पण म्हणून काय आपण त्यांचे अस्तित्व नाकारू शकतो का ? एकवेळ परमेश्वराचे अस्तित्व नाकारणारे बुद्धीजीवी भेटतील पण बुद्धी आहे हे तेही नाकारू शकणार नाहीत. म्हणून नजरेच्या भूल भुलैयात कधी तर्काची साथ सोडू नये ...

                       आपल्या डोळ्यांना जे दिसतं
                       ते नेहमीच खरं असत नाही,
                       कधी कधी जे खरं असतं
                       ते उघड्या डोळ्यांनीही दिसत नाही...!!!

रविवार, १७ जुलै, २०११

आपलं दुःख आणि 'तो'

     दुःख नेहमीच नकोसं वाटणारं...पण तितकंच अपरिहार्य. आपल्यापैकी प्रत्येकालाच आपापलं दुःख इतरांपेक्षा थोडं जास्तच वाटत असतं. मग हे दुःख आपल्याला परमेश्वरानच दिलं म्हणून आपली तक्रार सुरु होते. वेळोवेळी त्यासाठी ईश्वराला हजारदा जाब विचारला जातो. दुःखाला माप असतं तर लोकांनी नक्कीच त्याची मोजदाद करून पाहिली असती पण प्रत्येक गोष्टीसाठी रडण्याचा मानवी स्वभावाच आहे. पण मला वाटतं आपल्याला मिळालेलं दुःख हे सोसण्याइतकंच असतं. आपल्या सोसण्याची मर्यादा संपली की तो त्यातून आपली मुक्तता करतो...


सोसेल एव्हढेच दुःख
'तो' आपल्याला देतो
तेवढं सोसून झालं की,
जवळ बोलावून घेतो...

शनिवार, १६ जुलै, २०११

मोह आणि मन...

       अनादिकालापासून मानवी मन आणि मोह यांचा घट्ट संबंध आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या बायबल मधल्या अॅडम आणि इव्ह यांच्या कथेत मोहाचे ते फळ खाण्यासाठी मनाई केलेली असतानाही इव्ह ते फळ खाते आणि तेंव्हापासून दुःखास जबाबदार होतात. रामायणात वनवासात असतांनाही सीतेला एक राजकन्या आणि एक राज पत्नी असूनही एका सोन्याच्या हरणाचा मोह झालाच आणि पुढचे रामायण घडले, महाभारतात आपल्याला सत्ता मिळावी या मोहापायी दुर्योधनाने आपल्या कुलाचा विनाश ओढवून घेतला या सगळ्या उदाहरणांतून एकच गोष्ट समजते ती म्हणजे मानवी मन आणि मोह यांच्यात एक घटत वीण असलेले नाते आहे तेच नाते चारोळीतून व्यक्त करण्याचा मोह मलाही आवरता आला नाही...काय करणार मीही एक माणूसच आहे ना...!!!

              मोह आणि मनाचं
              अजबच असतं नातं,
              आधी मनात मोह येतो
              मग मन मोहात गुंतत जातं...

शुक्रवार, १५ जुलै, २०११

तस्मै श्री गुरुवेनमः

    आपल्याला जगात येतांना डोळे मिळालेले असतात पण त्या डोळ्यांनी आजूबाजूच्या जगाचे केवळ अवलोकन करता येते पण खरी दृष्टी मात्र देते ती आपली आई, जगातली सगळ्यात प्रथम वंदनीय गुरु. त्यानंतर शिक्षण देऊन आपल्या नजरेला विश्वात विखुरलेले ज्ञानकण आपल्या प्रकाशातून दृश्य स्वरुपात दाखवणारे आपले शिक्षक आपले गुरु ते आपल्या नजरेला अस्तित्वात असतांनाही न दिसू  शकणारे अणु रेणू जसे एखाद्या खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाच्या झरोक्यात दृश्यमान होतात तसा ज्ञानाचा प्रकाश प्रदान करतात अन आपले जीवन उजळून काढतात, त्यांच्याच कृपा प्रसादामुळे आपल्या चित्तास एकाग्रता आणि शांतता प्राप्त होते आणि धकाधकीच्या आजच्या जीवन शैलीतून काही काळासाठी शिथिलता प्राप्त होते...आज गुरुपौर्णिमा...गुरूंच्या कृपेचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस...त्यांच्या ऋणातून मुक्त होणे तर निव्वळ अशक्य !!! पण निदान आपण कृतज्ञता तरी व्यक्त करणे आपले आद्यकर्तव्य आहे म्हणूनच त्यांच्या चरणी माझी आजची चारोळी...

गुरूंच्या कृपाशीर्वादाने
मनाची अस्थिरता निवांत होते,
अवखळ झ-यांची खळखळ जशी
सरीतेत मिळाल्यावर शांत होते...

पाऊस आणि तू ...

     प्रणय  आणि पाऊस यांचा संबंध अगदी कालिदासाच्या मेघदूत पासून, मर्ढेकरांच्या कवितांपर्यंत आणि ग्रेस पासून संदीप खरेपर्यंत सगळ्यांनाच आपल्या मोहिनीत कैद करणारा. या पावसाच्या बरसण्याचा आणि प्रेमिकांच्या भेटीच्या ओढीने तरसण्याचा जो शृंगारिक भाव या सगळ्यांच्या काव्यातून उमटला तो केवळ अप्रतिमच ! पण या प्रतिभेला प्रेरणा देणारा पाऊस आणि त्या पावसातली त्या दोघांची चिंब भेट खरच खूप रोमांचक. अगदी आयुष्यात आलेल्या आणि येणाऱ्या सगळया पावसाळ्याच्या ऋतूंत पुरेल एवढी रोमांचाची शिदोरी देणारा तो क्षण... आजपर्यंत सगळ्याच कवी मनांना लिखाणाची प्रेरणा देतो...
                 मला भेटायला जेंव्हा तू
                 पडत्या पावसात यायचीस
                 मन माझं चातक अन
                 तू पाऊस होऊन जायचीस...

गुरुवार, १४ जुलै, २०११

तू समोर असतांना...

         कधी कधी आपलं आवडतं माणूस समोर असूनही डोळे मात्र त्याला मनात साठवून घेण्यासाठी आसुसलेले असतात. मग सगळ्या जगाचा चक्क विसर पडतो. फक्त आणि फक्त मग त्याच्या \ तिच्या डोळ्यात स्वतःचा शोध घेण्याचा खेळ !!! या खेळात आपण इतके रमून जातो की मग आपण आपल्यापासून खुपच दूर निघून जातो, मग परत जागेवर यायला मात्र वाटच सापडत नाही, पण हा शोधण्याचा आणि हरवण्याचा खेळ खेळण्यात एक वेगळीच गम्मत असते.

तू समोर असतांना
तुला डोळे भरून पहायचो,
तुझ्या गहिऱ्या डोळ्यात मला शोधतांना
मीच हरवून जायचो...

बुधवार, १३ जुलै, २०११

अश्रू आणि वेदना...

     अश्रू आणि वेदना या तशा दोन भिन्न बाबी पण त्यांच्यात एक सारखेपणा असा की त्यांच्या असण्यात कधीच काही फरक पडत नाही. वेदना ही कधीच सुखद असू शकत नाही आणि अश्रू कधीच गोड असू शकत नाहीत. मग वेदना प्रेमळ माणसाकडून मिळालेली असो नाहीतर अश्रू  आनंदात निघालेले असोत !!! या अश्रूंचं आणि वेदनेचं एक अनामिक पण अतूट असं नातं आहे, शरीर असो वा मन वेदना होताच अश्रू  अगदी सहज बाहेर पडतात. जणू काही तशी व्यवस्थाच असते...काही जन म्हणतील की आनंदात सुद्धा अश्रू  येतात ना मग वेदनेशी अश्रूंचं अतूट नातं कसं काय ? तर पहा असं म्हणणा-या लोकांसाठी हे उत्तर...

अश्रू आणि वेदना यांचं
कोण म्हणतं नातं नसतं,
वेदना झाल्याशिवाय कधी
डोळ्यात पाणी येत नसतं....

मंगळवार, १२ जुलै, २०११

मनावरचा मार ....

     शरीरावर झालेला वार कालांतराने विरून जातो, पण मनावर झालेली जखम मात्र कधीच मिळून येत नाही. मिटणं तर केवळ अशक्य. म्हणून कोणाच्या मनाला लागेल असं काही बोलू नये, आपल्या अपेक्षा दुसऱ्याच्या मनाला छेदुन तर जात नाहीत ना याचा आधी विचार करूनच मग त्या बोलून दाखवाव्या नाही तर मन दुखावून जिंकलेले पृथ्वीचे राज्यसुद्धा मातीमोल !!! मनावर झालेली जखम शरीरावरच्या मारापेक्षा जास्त खोलवर कायम बोचणारा सल तयार करते तिचा त्रास इतका भयंकर असतो की शब्दात तो व्यक्त करताच येऊ शकत नाही.....

मनावरच्या माराचे
वरून वण उमटत नाहीत
हुंदका दाटून आला की
शब्द सुद्धा फुटत नाहीत....

सोमवार, ११ जुलै, २०११

आपला परोपकार....

आजकाल आपण मोठमोठ्या लोकांची सत्कार्ये त्यांच्या बॅनर आणि कट आउट्स वर वाचायला मिळतात, तेव्हा आश्चर्य वाटते ते या गोष्टीचे की ही मंडळी थेंबाची मदत करतात आणि असा आव आणतात जणू काही यांनी मानव जातीसाठी आपल्या रक्ताचे पाट वाहिले. आजकाल आपण आपल्या कार्यकाळात आपल्या घरच्यांसाठी किती मेहनत घेतली आणि शून्यातून विश्व निर्माण केले याच्या बढाया ऐकायला मिळतात पण या त्यांच्या कर्तृत्वाच्या काळात दातृत्वाचे काय ? म्हणून विचारलं तर जमले तेंव्हा त्यांनी ट्रेनमध्ये भिकाऱ्याला बऱ्याचदा पन्नास पैसे दिलेले असतात ना !!! हेच आमचे माणूस म्हणून माणसासाठी केलेले महान योगदान असते...शून्यातून निर्माण केलेल्या विश्वात फक्त आपल्या घरच्याच माणसांना जागा असते तिथे इतरांना मुळीच स्थान नसते....तेंव्हा निसर्गाच्या महान दातृत्वाची पुन्हा एकदा आठवण आल्याशिवाय राहत नाही....खरंच तो महान आहे...

आकाशातला तारा निखळूनही
पाषाणाची लादी होतो,
गेल्यावर सोडाच जगतांना तरी
आपण किती कुणाच्या कामी येतो...?

रविवार, १० जुलै, २०११

व्यक्त होतांना....

     आपण नेहमीच काही गोष्टी मनात ठेवतो, कधी तरी त्या बोलून दाखवू म्हणून मनात तशाच त्या आपण साठवतो पण निसर्गाचाच नियम सांगतो कि ज्या गोष्टी एकाच जागी तशाच राहतात कालांतराने त्या कुजतात आणि त्यांचा वास येतो, म्हणून माणसाने मनात काहीच ठेवू नये जे मनात येईल ते शब्दात व्यक्त करून टाकावे म्हणजे मनात त्याचे विष तयार होणार नाही. भलेही पुढच्याला आपला कितीही राग येवो नाहीतर कितीही आपलेपणा वाटो. कधी कधी तर आपल्या चूप राहण्यातून बरचसं नुकसानच होत असतं, म्हणून...

                  राग येवो लोभ वाटो
                 आपण नेहमी व्यक्त व्हावं
                 साचल्या नंतर सडलेपण येतं
                 आपण झ-यागत  वाहून जावं.....

शुक्रवार, ८ जुलै, २०११

प्रेमाचा परतावा.......

     प्रेम एक नाद, एक वेड, एक स्मित, एक वेदना, एक संपदा तेवढाच एक त्याग !!! प्रेमाला शब्दात बांधता येत नाही. प्रेमभावनेची भव्यता ज्याची त्यालाच कळते, तेजाची ओढ पाकोळयाला  चिरंतन काळापासून आहे, त्याला आपल्या होरपळून मारण्याचीही तमा नसते, त्याला फक्त आणि फक्त आपल्या प्रेमाचे तेजाचे आकर्षण असते. त्याच्यात जाऊन मिळण्याची , जीव देऊन एकजीव होण्याची जी तळमळ असते ती आपल्यासाठी नवलाचा विषय होऊन जातो. प्रेमात त्याग करण्याचं यापेक्षा महान उदाहरण दुसरे देताच येणार नाही. त्याला त्याच्या प्रेमातून काही मिळवण्याची कधीच अपेक्षा नसते, त्याला तर बिचाऱ्याला फक्त मिटून जाऊन आपल्या निर्व्याज, निस्वार्थी प्रेमाची अभिव्यक्ती करायची असते...

ज्योतीवर  प्रेम करणारा पाकोळा
तेजात तिच्या होरपळतो
निर्व्याज प्रेमाचा या जगात
असा परतावा मिळतो.....!!!

गुरुवार, ७ जुलै, २०११

कुणाच्या नावावर कुणाचा दोष........

            नेहमीच आपण झालेल्या गोष्टी चुकल्या तर त्याचा दोष परमेश्वराला देणारे लोक बघतो, चूक माणसाची आणि दोष मात्र 'त्या' बिचाऱ्याचा !!! आहे की नाही कमाल ? काही झाले की 'जाऊ द्या देवाच्याच मनात नसेल, मी खूप प्रयत्न केला पण देवालाच ते मंजूर नव्हते', तुला माझे दुःख दिसत नाही का ? आहेस तर मग कुठे जाऊन बसलास ? असे सारखे दोष आपण त्याच्या माथी मढत असतो.......बरं खरच त्याचा यात काही दोष असतो का ? नाही...मला वाटतं आपल्या भल्या बुऱ्या गोष्टीना आपणच जबाबदार असतो.म्हणून आपल्या चांगल्या गोष्टीचं श्रेय लाटायला जसे आपण पुढे सरसावतो तसंच आपल्या चुकांची जबाबदारीही आपणच स्वीकारावी त्यासाठी देवाला दोष देऊ नये.....

                                                           आपलं वाईट होण्यात कधी
                                                           वरच्याचा हात का असतो ?
                                                           आपण  मात्र काम बिघडलं की
                                                           त्यालाच दोष देत बसतो....!!!

बुधवार, ६ जुलै, २०११

आनंदाचं फुलझाड.....

     आनंद....सगळ्यांना हवा असणारा. उभं आयुष्य आपण आनंदाच्या शोधात असतो. मिळेल तिथून मिळेल तेवढा आनंद आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण हा आनंद कायम आपल्या मनात साठवण्याची काही सोय नसते, म्हणून तरी ठीक आहे  नाहीतर छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा सर्वसामान्यांचा आनंद स्वीस बँकेत जमा झाला असता !!! मिळालेल्या गोष्टीत आनंदी राहण्याचा स्वभाव बनवला तर आपण जास्त काळ आनंदी राहू शकू नाहीतर अधिकाधिक मिळवण्याच्या हव्यासापोटी आपली सुद्धा हात लावील त्याचे सोने करणाऱ्या मिडास राजासारखी अवस्था होऊन जाईल आणि जीवन ओसाड होऊन जाईल...म्हणून मिळाले तेवढ्यात समाधानी राहून त्यातून मिळणारा आनंद उपभोगायला पाहिजे..... 

                                                   मिळालं तेवढ्यात आनंदी नाहीत 
                                                   म्हणून आपलं जीवन ओसाड आहे,
                                                   खरं तर समाधानाच्या अंगणातच
                                                   आनंदाचं फुलझाड आहे........

सोमवार, ४ जुलै, २०११

मी आरशाला फसवतो तेंव्हा....

     आजचा काळ आपल्या असण्यापेक्षा दिसण्यावर जास्त भर देणारा आहे. मग आपण कसे दिसतो ते बघणे ओघाने आलेच. साहजिकच मग आपले रूप न्याहाळायला आरसा लागणारच. पण मला मात्र या आरशात डोकावल्यावर एक विचार स्पर्शून गेला, आपण जसे दिसतो तसे आरसा दाखवतो पण आपण जसे असतो तसे दाखवण्यात हा आरसा कमी पडतो. आपण आतून कसे आहोत ते सांगण्यासाठी आरसाच काय करायचा ? आपण मात्र त्या बिचाऱ्याची उगीच फसवणूक करतो. आपल्या आतला खरा चेहरा झाकून ठेवून नीटनेटका दुसराच कोणी आपण असल्याचा फसवा आभास निर्माण करतो...निदान मी तरी तसे करतो आणि त्याची जाणीव दर वेळी आरशासमोर गेलो की मला होते म्हणून........

                                       आजकाल मी राजरोसपणे
                                       आरशालाही फसवतो,
                                       त्यात दिसणारा भला कोणीतरी
                                       मीच असल्याचं भासवतो.........!!! 
 

रविवार, ३ जुलै, २०११

नेत्यांचा देव आणि 'भाव'

      हल्ली राजकारणात आपला प्रभाव दाखवण्यासाठी कोणता नेता काय शक्कल लढवील सांगता येत नाही, पक्षनिष्ठा ते पक्षातून निसटा असा आपल्या लोकशाही नेत्यांचा राजकीय प्रवास होऊन झाला आहे. सत्ता नाहीतर पद मिळवण्यासाठी डावे उजव्यांच्या मागे,तर कधी उजवे आपल्या सोबत्यांच्याच हात धुवून मागे लागलेले दिसतायत !!! कोणत्याच विकासाच्या मुद्द्यावर एकत्र न येणारी हि मंडळी मात्र फायद्याच्या मुद्द्यावर लगेच एक होतात !!! एका पक्षात हा फायदा मिळत नसेल तर मग लगेच तळ्यातून मळ्यात उडी मारायला वेळच लावत नाहीत मग काही 'भाव' खुर्चीच्या स्वप्नाशी तडजोड स्वीकारली जात नाही !!! 

जो देतो 'प्रसाद'
तोच त्यांचा देव असतो 
दिवसातून सतरा वेळा बदलणारा 
या नेतेलोकांचा 'भाव' असतो.....!!!

शनिवार, २ जुलै, २०११

चहापेक्षा केटली गरम ......

     आजकाल एका मोठ्या नेत्यामागे कार्यकर्त्यांची फौज दिसते, ते स्वतःला त्यांचे  पाठीराखे समजतात, त्यांचा नेता भलेही त्यांना उजवाच काय पण डावा हातही समजत नसेल पण त्यांच्याशी यांची स्वयंघोषित जवळीकता नेत्याच्या पेक्षाही जास्त अखड कार्यकर्त्यांच्याच अंगात आणते!!! मग काय कार्यकर्ते नेत्याच्याच गरमीत आणि गुर्मीत बोलत सॉरी आदेश सोडत सुटतात  !!! हा अनुभव तुम्हालाही नक्कीच आला असेल.

मोठ्यांच्या मागेपुढे राहून
लहानांनाच माज येतो
शंख कानाला लाऊन पहा
आतून लाटांचा आवाज येतो !!! 

शुक्रवार, १ जुलै, २०११

खरा सोहळा....

        दररोज लोक सकाळी स्नान करून देवदर्शन करतात. सगळ्या अंगाला गंध भस्म लावतात, ग्रंथ वाचतात पण हे सगळे सोपस्कार म्हणजे भक्ती असा त्यांचा कयास असतो पण नुसता दिखाऊपणा करायचा आणि माणुसकी विसरून माणुसकीला लाजवणारी कामे दिवसभर करायची हा विरोधाभास जगायचा ही विसंगती आपल्या तर्काला पटणारी नाही. त्यापेक्षा माणसातला देव ओळखून आपल्या अंतरात इतरांप्रती असलेला भाव निर्मळ ठेवला तरी पुरेसे आहे असे माझे मत आहे, त्यासाठी रोजच मंदिराच्या पायऱ्या झीजवायची सुद्धा काही गरज नाही.....

मनातला भाव जेव्हा 
निर्मळ आणि मोकळा असतो 
केलेलं कर्म एक पूजा 
अन प्रत्येक दिवस सोहळा असतो........

गुरुवार, ३० जून, २०११

दिव्याची वात.....

       स्वार्थाने बरबटलेल्या या जगात चांगलेही लोक काही कमी नाहीत.    पण त्या चांगुलपणाची त्यांना चांगलीच किंमत मोजावी लागते, या किमतीच्या अदायगीसाठी पराकोटीची हिम्मत लागते. सगळेजण त्या चांगुलपणाचा फायदा उचलायला तर सरसावून पुढे होतात पण जेव्हा काम निघून गेलेले असते तेव्हा मात्र त्यांना या चांगल्या लोकांची साधी आठवण सुद्धा येत नाही !!! किती कमालीचे जग आहे हे ! लोक चांगली कामं  करण्याचा मनोभावे संकल्प करतात आणि मग त्याची किंमत मोजायची वेळ आली कि मात्र मग पळ काढतात !!! असो, चांगुलपणात स्वतःचा बळी देणाऱ्या पण आपला भोवतालचा अंधार हटवणा-या  दिव्याच्या वातीची हिम्मत पहा नं,

दुसऱ्याला उजेड देण्यासाठी
दिव्याची वात स्वतः जळते
या जगात चांगुलपणाची 
एवढी किंमत मिळते !!!   

बुधवार, २९ जून, २०११

जीवनाचा खरा अर्थ......

     हे जीवन निरतिशय सुंदर आहे, त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या अनेकांनी केल्या पण तेवढ्यामध्ये मर्यादित होईल ती जीवनाची संकल्पना कसली ? ह्या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करणारे, जिंदगी कैसी ही पहेली म्हणणारे आणि जीना इसी का नाम है म्हणणाऱ्या प्रत्येकाला या जीवनाचा जिवंत साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपापल्या रचनांमध्ये तो व्यक्त करण्याचा प्रयत्नदेखील केला...पण मला वाटतं या जीवनाचा अर्थ कुणालाही तेव्हा कळतो जेव्हा ते अत्तराच्या कुपीतल्या अत्तराप्रमाणे भुर्रकन उडून जाण्याच्या तयारीत असते....
आयुष्यभर उगीच आपण 
सावल्यांच्या मागे पळतो 
जीवनाचा खरा अर्थ मात्र 
मृत्युशय्येवरच कळतो !!!

मंगळवार, २८ जून, २०११

जबान संभाल के ........

शब्द...भावना व्यक्त करण्यासाठीचं माध्यम..परंतु हे माध्यम जितकं  सोपं , सहज तितकंच ते घातक आणि भयंकर सुदधा  ठरतं !!! दुखऱ्या मनाच्या वेदना शमवणारे हेच शब्द कधी कुणाच्या मनोवेदनेचे कारण बनतात, त्यांना जशी भावनेची ओल असते तशीच त्यांना काळीज कापणारी  तीव्र धार सुद्धा असते म्हणूनच म्हणतात, ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकले !!!

कधी शब्द सुखावून जातात
कधीजिव्हारी लागत जातात
शब्द आपले असतात तेच
अर्थ मात्र वेगळे निघत जातात.....

म्हणून जरा ''जबान संभाल के ........!!!!!!!!!''

रविवार, २६ जून, २०११

प्रेमात पडल्यावर...

प्रेमात पडलेल्या लोकांचं काही खरं नसतं म्हणूनच त्यांना कोणी वेडे, कोणी दिवाने आणि कोणी पागल म्हणते, ते कधी स्वतःशीच गप्पा मारतात, कधी एकटेच हसतात, कधी भेट झाल्यावर बोलायच्या वाक्यांची मनोमन रिहर्सल करतांना जगाला विसरून जातात, कधी कधी तर धम्मालच होते...कशी ते पहा....
जायचं असतं एकीकडं 
मन वळवतं तुझ्याकडं 
लोक म्हणतात प्रेमापायी
शहाणं माणूस झालं येडं....


     आजकाल कोणासाठीही कुणाकडे जरासुद्धा वेळ नाही. प्रत्येकाने आपापल्या विश्वाभोवती कुंपण लाऊन घेतले आहे. हा मर्यादितपणा, संकुचितपणा या नव्या जगाचा नवा कायदा होऊन गेला आहे. पण असं बंदिस्त होऊन चौकटीत राहणे पटत नसणाऱ्या आपल्यासारख्याचं काय ??? तर तो आपला स्वभावदोष आहे...आपल्यालाच या नव्या पद्धतीत राहणे पसंत नाही....म्हणून असे जग अशा लोकांनाच लख लाभ असो...आपल्या ला जे जमत नाही ते जमतच नाही...काय करणार ?????

आज सगळेच संकुचित इथे
आणि ज्याचा त्याचा कोश आहे
आपल्याला असं पटत नाही
हा आपलाच स्वभावदोष आहे !!!!

शुक्रवार, २४ जून, २०११

क्षितीज....

     असं म्हणतात प्रेमापुढे भल्याभल्यांना झुकावं लागतं, आणि ते खरंही आहे. ढग एवढे उंचावरून जातात पण धरणीची साद त्यांना बरसायला भाग पडते, माणूस मग तो एखादा पहिलवान जरी असला तरी तो त्याच्या लहान मुलाने  हाताला धरून खाली बसवले तरी चित् झाल्यासारखा खाली पडतो !!! ही ताकद बाहूंची नसते तर प्रेमाची असते . सृष्टीतही अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात..आता क्षितीजाचच पहा ना,  

पृथ्वीवरच्या प्रेमाखातर
आभालालाही झुकावं लागतं
क्षितिजाचं रूप घेऊन त्याला
हातावरती टेकावं लागतं....









गुरुवार, २३ जून, २०११

प्रवासात भेटणारे.....

                प्रवासात असंख्य अनोळखी चेहरे भेटतात...आपले नसूनही ते आपले वाटतात...कधी कधी तर आपण त्यांना आधी कुठेतरी भेटल्याचा भास होतो...आणि कधी कधी तर हे अनोळखी अपरिचित असूनही जवळ बसून जवळचे होतात आणि वाटतं की ज्यांना आपण आपले म्हणून जवळीक करायला जातो ते कधीच मनाने आपले होत नाहीत...सुरक्षित अंतर ठेवून राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात...अशावेळी मला वाटतं....

               कोण म्हणतं प्रवासात भेटणारे
               आपले कधीच कुणी नसतात
               आपले आपल्यापासून दूर
               परके तरी जवळ बसतात... 

मंगळवार, २१ जून, २०११

मनातला पाऊस...

          पाऊस....मनातला मन भरून बरसणारा आणि मन भरून आणणारा...पावसाचा आणि जुन्या आठवणींचा संबंध तसा जास्तच जवळचा....ढग दाटून येतात तशा आठवणीही दाटतात...वाऱ्याच्या झुल्केनेही ढग जसा झरतो तसंच मन भरून आलेलं असलं की डोळ्यांनाही धार लागते...का हा पाऊस नेहमीच एवढा आपला एवढा जवळचा वाटतो ??? का कुणास ठाऊक ? त्याचं आपल्याशी एक शब्दातीत नातं असतं....ते नातं म्हणूनच पावसाची वाट आतुरतेनं पाहायला लावतं.....
            
              सखे तुझ्या आठवणींच्या
              आज सरींवर सारी आल्या
              मरून खोडप्राय भावना
              परत एकदा ओल्या झाल्या.....

बोलणं प्रेमातलं...

    प्रेमात असणाऱ्यांची एक वेगळीच दुनिया असते. त्यात फक्त दोघांपुरतीच जागा असते. त्या दोघांचा एकमेकांवर तेवढा विश्वासही असतो. म्हणून त्यांच्यात खरं खोटं बोलणं असा काही प्रकारच नसतो. जे काही बोलणं होतं ते फक्त दोघांनाही बरं वाटत असतं. अगदी थापासुद्धा खऱ्या वाटतात !!!

खोटं खोटंच बोलणं तुझं
मला मात्र खरं वाटतं
खरं खोटं तूच जाणो
मला मात्र बरं वाटतं...!!! 

रविवार, १९ जून, २०११

आई...

         या जगातला सगळ्यात सुंदर शब्द म्हणजे आई...आणि सर्वात पवित्र गोष्ट म्हणजे तिचे निरपेक्ष प्रेम...आपली आई आपल्याला नेत्रांचा दिवा करून आणि हातांचा पाळणा करून लहानाचं मोठं करते...कधी यशोदा होऊन आपल्या खोड्या माफ करते तर कधी श्यामची आई होऊन शिस्तीचे धडे देते...नुसते हळवे न बनवता कठीण प्रसंगात खंबीर होण्याचं बळसुद्धा तीच आपल्याला देते...

छोट्या मोठ्या संकटांनी जेव्हा 
आपलं अवसान गळून जातं 
नुसतं 'आई' म्हटलं तरी 
भयं कुठल्या कुठं पळून जातं....

शनिवार, १८ जून, २०११

          जगात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. आपण विचार करतो एक आणि होऊन बसते मात्र वेगळेच !!! कधीच ठरवल्याप्रमाणे काही होत नाही. आपल्या बाबतीत हे सगळं जाणून बुजून तर होत नसेल न असं, कोणी मुद्दाम तर असं आपल्याशी वागत नसेल न असं ? या प्रश्नाचे एक उत्तर म्हणजे आपल्याशी असं खेळणारी असते नियती , मांजर जसा उंदराशी खेळ खेळून थकल्यावर त्याची शिकार करते तद्वतच क्रूर खेळ नियतीही आपल्याशी खेळत असते....

                                                         नियती आणि माणसाचा

संबंधच असतो केवढा ???
माकड आणि मदारी यांचा
खेळ असतो तेवढा.... 

शुक्रवार, १७ जून, २०११

           आपल्या पैकी प्रत्येकाचाच ईश्वराच्या ठाई भाव हा असतोच. हा ईश्वर आपल्या सगळ्या दुःखातून आपली सोडवणूक करील हा विश्वास अगदी दृढ असतो. पण हा भाव, ही भक्ती एखाद्या दुःखाच्या लाटेने आहत झाल्याशिवाय तेवढीशी बळकट होत नाही. संकटात,दुःखात,अडचणीत सापडल्यावर आपण त्याला यातून सोडवण्याची विनंती करतो,साकडे घालतो पण सुखाच्या काळात कधी आपल्याला त्याची आठवण येत नाही !! मग आपण त्याला आठवावं म्हणूनच तर कदाचित दुःख ही त्याचीच एक योजना तर नसेल....


                                                              भक्तीच्या मुळाशी दडलेली
                                                                 एक मुकी वेदना असते
                                                             दुःखातच त्याला आठवावं
                                                                अशी देवाचीच योजना असते...

गुरुवार, १६ जून, २०११


आजची माझी चारोळी.....
      आयुष्याच्या एखाद्या वळणावर कोणी तरी आयुष्यात येतं, त्याचं येणं जगण्याची दिशाच बदलून टाकतं, सगळं जग उत्सव साजरा करीत असल्याचा रुपेरी भास व्हायला लागतो, आपण स्वतःवर जास्त प्रेम करायला लागतो, जगण्याच्या प्रेरणेला कारण सापडलेलं असतं, त्या एका व्यक्तीसाठी जगाशी टक्कर घ्यायची सुद्धा तयारी असते, तिच्या सहवासातला प्रत्येक क्षण मनात गोन्दनासारखा कोरल्या गेलेला असतो पण......अचानक त्या व्यक्तीची आणि आपली नकळत ताटातूट होते आणि मन उदासून जातं,जे कधी मिळालंच नव्हतं तेच हरवल्याची जाणीव मन अंधारून टाकते तेव्हा....आपण व्यथित होऊ नये, ही  पृथ्वी गोल आहे जो जातो तो परतही येतोच आणि जिथे ऋणानुबंध असतो तिथे तर कधी जाणाऱ्याला अडवूच नये का ते पहा.....
                                                                    
                         जाणाऱ्याला कधी अडवू नये
                    आपल्याच मनाला घालावा आवर            
                    जाऊन जाऊन जाईल कोठे ???
                    ऋणानुबंध असल्यावर....


   

बुधवार, १५ जून, २०११

आजची माझी चारोळी....

कधी कधी आपण एखाद्या चिंतेने ग्रासले जातो.आपल्या सभोवतीच्या कोणत्याही गोष्टी आपल्या मनाला सुखावू शकत नाहीत, आपल्या मनातील व्यथा मनाचा गाभारा अंधारून टाकते , तेव्हा आपण स्वतःला एका अनामिक कोषात गुरफटून घेऊन आतल्या आत जिरत असतो अशा वेळी धीर न सोडता परमेश्वरावर सगळी चिंता सोडून देउन निश्चिंत व्हावे. त्या सख्याला मनीच्या चिंता सांगितल्याने आपले मन हलके तर होतेच पण पुन्हा नव्या संकटांना तोंड देण्याची उर्जा आपल्या मनाला मिळते म्हणूनच मला वाटतं.......
                                                        
                                                   सगळी दुःखं संपून जातात
                                                   विश्वास ठेवावा वरच्यावर 
                                                   दगडाचाही परीस होतो 
                                                   'त्याची' एक नजर पडल्यावर.....
                                   
                                                 पटत नसेल तर आजमावून पहा...

सोमवार, १३ जून, २०११

माझी आजची चारोळी...

आपण जे काही लिहितो, आपल्याला जे काही सुचतं, ती आपली प्रतिभा आहे असंच आपल्याला वाटत असतं,पण हे सगळं आधीच कुठेतरी अस्तित्वात असतं फक्त आपल्याला त्याचा एका निश्चित वेळी साक्षात्कार घडतो आणि ती कल्पना शब्दाचं रूप लेवून कागदावर अवतरित होते...म्हणूनच 'तो' आपल्याला या आविष्कारासाठी निवडतो आणि आपण त्या लिखाणाचं माध्यम बनतो.......हाच ईश्वर आपल्यासारख्या नगण्य यःकश्चित लोकांना खूप काही देतो आपण मात्र त्यालाच त्यातून थोडासा देवून भूलवायला बघतो...!!! या विसंगतीवर सुचलेली ही चारोळी खास आपणा सर्वांसाठी....
                                ''मोठ्या भेटी मोठे हार वाहून
                                 दानशूरपणाचा आव आणतात,
                                 त्याचंच घेऊन त्यालाच देण्यात
                                 लोक धन्यता मानतात !!!"