डोक्यानेच विचार करू नये
कधी मनालाही वाव द्यावा,
गणिती हिशेब बाजूला ठेवून
भावनांनाही भाव द्यावा....
मन एक अगम्य,अथांग,अकल्प्य आणि अतर्क्य असा विषय...या मनाचा एक आवाज नेहमीच मला ऐकू आलेला...त्याला कुणी श्रीकृष्णाच्या वेणूचे नाव दिलं तर कोणी मीरेची प्रेमधून म्हटलं,कुणाला विश्वाचे आर्त वाटला हा आवाज तर कोणाला सत्यम शिवं सुंदरम चा आभास जाणवला याच आवाजात... आणि तोच हा आपल्याच अंतरातून ध्वनित होणारा....'अंतर्नाद'.
प्रेमाच्या विश्वातल्या संकल्पना आणि गणित काही तरी औरच!!! भूमिती मध्ये एकरूपता नावाचा एक प्रकार असतो, त्यात काही ठराविक रेषा काही रेषांची आणि काही कोन काही कोनांशी एकरूप असतात पण प्रेमाच्या भूमितीतही ही एकरूपता प्रकर्षाने जाणवते. तो आणि ती दोघे एकमेकांना अनुरूप असले की मग ते एकरूप होतात.आणि इतके एकरूप होतात की अगदी एकरूप होतात. प्रेमाच्या या गणितात बेरीज आणि वजाबाक्याही अशाच काहीशा सारख्या काहीश्या वेगळ्या... प्रेमाच्या बेरजेत एक तो आणि एक ती मिळून दोन हे उत्तर येत नाही तर उत्तर एकच येते आणि वजाबाकीत दोघांपैकी एकजरी दुसऱ्याला सोडून गेला तर मात्र उत्तर शून्य येते म्हणजे बाकी काही शिल्लकच राहत नाही..!!! सगळं काही संपून जातं.
आपले डोळे आपल्याला जे दाखवतात ते आणि तेवढेच आपण बघतो अन तेच सत्य तेच खरे असे आपण मानतो. पण बऱ्याचदा हे डोळे आपली बेमालूम फसवणूक देखील करतात, मग आपण म्हणतो माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नाही..! म्हणून नेहमीच डोळ्यांवर १०० टक्के विश्वास कधीच टाकू नये ? दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी असतातच असे नाही आणि असणाऱ्या सगळ्या गोष्टी दिसतीलच असेही नाही. क्षितीज डोळ्यांना दिसते, मृगजळ डोळ्यांना दिसते पण मुळात ते अस्तित्वात असत नाही, आणि परमेश्वर, आपली बुद्धी दिसत नाही पण म्हणून काय आपण त्यांचे अस्तित्व नाकारू शकतो का ? एकवेळ परमेश्वराचे अस्तित्व नाकारणारे बुद्धीजीवी भेटतील पण बुद्धी आहे हे तेही नाकारू शकणार नाहीत. म्हणून नजरेच्या भूल भुलैयात कधी तर्काची साथ सोडू नये ...
अनादिकालापासून मानवी मन आणि मोह यांचा घट्ट संबंध आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या बायबल मधल्या अॅडम आणि इव्ह यांच्या कथेत मोहाचे ते फळ खाण्यासाठी मनाई केलेली असतानाही इव्ह ते फळ खाते आणि तेंव्हापासून दुःखास जबाबदार होतात. रामायणात वनवासात असतांनाही सीतेला एक राजकन्या आणि एक राज पत्नी असूनही एका सोन्याच्या हरणाचा मोह झालाच आणि पुढचे रामायण घडले, महाभारतात आपल्याला सत्ता मिळावी या मोहापायी दुर्योधनाने आपल्या कुलाचा विनाश ओढवून घेतला या सगळ्या उदाहरणांतून एकच गोष्ट समजते ती म्हणजे मानवी मन आणि मोह यांच्यात एक घटत वीण असलेले नाते आहे तेच नाते चारोळीतून व्यक्त करण्याचा मोह मलाही आवरता आला नाही...काय करणार मीही एक माणूसच आहे ना...!!!
आपल्याला जगात येतांना डोळे मिळालेले असतात पण त्या डोळ्यांनी आजूबाजूच्या जगाचे केवळ अवलोकन करता येते पण खरी दृष्टी मात्र देते ती आपली आई, जगातली सगळ्यात प्रथम वंदनीय गुरु. त्यानंतर शिक्षण देऊन आपल्या नजरेला विश्वात विखुरलेले ज्ञानकण आपल्या प्रकाशातून दृश्य स्वरुपात दाखवणारे आपले शिक्षक आपले गुरु ते आपल्या नजरेला अस्तित्वात असतांनाही न दिसू शकणारे अणु रेणू जसे एखाद्या खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाच्या झरोक्यात दृश्यमान होतात तसा ज्ञानाचा प्रकाश प्रदान करतात अन आपले जीवन उजळून काढतात, त्यांच्याच कृपा प्रसादामुळे आपल्या चित्तास एकाग्रता आणि शांतता प्राप्त होते आणि धकाधकीच्या आजच्या जीवन शैलीतून काही काळासाठी शिथिलता प्राप्त होते...आज गुरुपौर्णिमा...गुरूंच्या कृपेचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस...त्यांच्या ऋणातून मुक्त होणे तर निव्वळ अशक्य !!! पण निदान आपण कृतज्ञता तरी व्यक्त करणे आपले आद्यकर्तव्य आहे म्हणूनच त्यांच्या चरणी माझी आजची चारोळी...
प्रणय आणि पाऊस यांचा संबंध अगदी कालिदासाच्या मेघदूत पासून, मर्ढेकरांच्या कवितांपर्यंत आणि ग्रेस पासून संदीप खरेपर्यंत सगळ्यांनाच आपल्या मोहिनीत कैद करणारा. या पावसाच्या बरसण्याचा आणि प्रेमिकांच्या भेटीच्या ओढीने तरसण्याचा जो शृंगारिक भाव या सगळ्यांच्या काव्यातून उमटला तो केवळ अप्रतिमच ! पण या प्रतिभेला प्रेरणा देणारा पाऊस आणि त्या पावसातली त्या दोघांची चिंब भेट खरच खूप रोमांचक. अगदी आयुष्यात आलेल्या आणि येणाऱ्या सगळया पावसाळ्याच्या ऋतूंत पुरेल एवढी रोमांचाची शिदोरी देणारा तो क्षण... आजपर्यंत सगळ्याच कवी मनांना लिखाणाची प्रेरणा देतो...
कधी कधी आपलं आवडतं माणूस समोर असूनही डोळे मात्र त्याला मनात साठवून घेण्यासाठी आसुसलेले असतात. मग सगळ्या जगाचा चक्क विसर पडतो. फक्त आणि फक्त मग त्याच्या \ तिच्या डोळ्यात स्वतःचा शोध घेण्याचा खेळ !!! या खेळात आपण इतके रमून जातो की मग आपण आपल्यापासून खुपच दूर निघून जातो, मग परत जागेवर यायला मात्र वाटच सापडत नाही, पण हा शोधण्याचा आणि हरवण्याचा खेळ खेळण्यात एक वेगळीच गम्मत असते.
अश्रू आणि वेदना या तशा दोन भिन्न बाबी पण त्यांच्यात एक सारखेपणा असा की त्यांच्या असण्यात कधीच काही फरक पडत नाही. वेदना ही कधीच सुखद असू शकत नाही आणि अश्रू कधीच गोड असू शकत नाहीत. मग वेदना प्रेमळ माणसाकडून मिळालेली असो नाहीतर अश्रू आनंदात निघालेले असोत !!! या अश्रूंचं आणि वेदनेचं एक अनामिक पण अतूट असं नातं आहे, शरीर असो वा मन वेदना होताच अश्रू अगदी सहज बाहेर पडतात. जणू काही तशी व्यवस्थाच असते...काही जन म्हणतील की आनंदात सुद्धा अश्रू येतात ना मग वेदनेशी अश्रूंचं अतूट नातं कसं काय ? तर पहा असं म्हणणा-या लोकांसाठी हे उत्तर...
शरीरावर झालेला वार कालांतराने विरून जातो, पण मनावर झालेली जखम मात्र कधीच मिळून येत नाही. मिटणं तर केवळ अशक्य. म्हणून कोणाच्या मनाला लागेल असं काही बोलू नये, आपल्या अपेक्षा दुसऱ्याच्या मनाला छेदुन तर जात नाहीत ना याचा आधी विचार करूनच मग त्या बोलून दाखवाव्या नाही तर मन दुखावून जिंकलेले पृथ्वीचे राज्यसुद्धा मातीमोल !!! मनावर झालेली जखम शरीरावरच्या मारापेक्षा जास्त खोलवर कायम बोचणारा सल तयार करते तिचा त्रास इतका भयंकर असतो की शब्दात तो व्यक्त करताच येऊ शकत नाही.....
आजकाल आपण मोठमोठ्या लोकांची सत्कार्ये त्यांच्या बॅनर आणि कट आउट्स वर वाचायला मिळतात, तेव्हा आश्चर्य वाटते ते या गोष्टीचे की ही मंडळी थेंबाची मदत करतात आणि असा आव आणतात जणू काही यांनी मानव जातीसाठी आपल्या रक्ताचे पाट वाहिले. आजकाल आपण आपल्या कार्यकाळात आपल्या घरच्यांसाठी किती मेहनत घेतली आणि शून्यातून विश्व निर्माण केले याच्या बढाया ऐकायला मिळतात पण या त्यांच्या कर्तृत्वाच्या काळात दातृत्वाचे काय ? म्हणून विचारलं तर जमले तेंव्हा त्यांनी ट्रेनमध्ये भिकाऱ्याला बऱ्याचदा पन्नास पैसे दिलेले असतात ना !!! हेच आमचे माणूस म्हणून माणसासाठी केलेले महान योगदान असते...शून्यातून निर्माण केलेल्या विश्वात फक्त आपल्या घरच्याच माणसांना जागा असते तिथे इतरांना मुळीच स्थान नसते....तेंव्हा निसर्गाच्या महान दातृत्वाची पुन्हा एकदा आठवण आल्याशिवाय राहत नाही....खरंच तो महान आहे...
आपण नेहमीच काही गोष्टी मनात ठेवतो, कधी तरी त्या बोलून दाखवू म्हणून मनात तशाच त्या आपण साठवतो पण निसर्गाचाच नियम सांगतो कि ज्या गोष्टी एकाच जागी तशाच राहतात कालांतराने त्या कुजतात आणि त्यांचा वास येतो, म्हणून माणसाने मनात काहीच ठेवू नये जे मनात येईल ते शब्दात व्यक्त करून टाकावे म्हणजे मनात त्याचे विष तयार होणार नाही. भलेही पुढच्याला आपला कितीही राग येवो नाहीतर कितीही आपलेपणा वाटो. कधी कधी तर आपल्या चूप राहण्यातून बरचसं नुकसानच होत असतं, म्हणून...
प्रेम एक नाद, एक वेड, एक स्मित, एक वेदना, एक संपदा तेवढाच एक त्याग !!! प्रेमाला शब्दात बांधता येत नाही. प्रेमभावनेची भव्यता ज्याची त्यालाच कळते, तेजाची ओढ पाकोळयाला चिरंतन काळापासून आहे, त्याला आपल्या होरपळून मारण्याचीही तमा नसते, त्याला फक्त आणि फक्त आपल्या प्रेमाचे तेजाचे आकर्षण असते. त्याच्यात जाऊन मिळण्याची , जीव देऊन एकजीव होण्याची जी तळमळ असते ती आपल्यासाठी नवलाचा विषय होऊन जातो. प्रेमात त्याग करण्याचं यापेक्षा महान उदाहरण दुसरे देताच येणार नाही. त्याला त्याच्या प्रेमातून काही मिळवण्याची कधीच अपेक्षा नसते, त्याला तर बिचाऱ्याला फक्त मिटून जाऊन आपल्या निर्व्याज, निस्वार्थी प्रेमाची अभिव्यक्ती करायची असते...
नेहमीच आपण झालेल्या गोष्टी चुकल्या तर त्याचा दोष परमेश्वराला देणारे लोक बघतो, चूक माणसाची आणि दोष मात्र 'त्या' बिचाऱ्याचा !!! आहे की नाही कमाल ? काही झाले की 'जाऊ द्या देवाच्याच मनात नसेल, मी खूप प्रयत्न केला पण देवालाच ते मंजूर नव्हते', तुला माझे दुःख दिसत नाही का ? आहेस तर मग कुठे जाऊन बसलास ? असे सारखे दोष आपण त्याच्या माथी मढत असतो.......बरं खरच त्याचा यात काही दोष असतो का ? नाही...मला वाटतं आपल्या भल्या बुऱ्या गोष्टीना आपणच जबाबदार असतो.म्हणून आपल्या चांगल्या गोष्टीचं श्रेय लाटायला जसे आपण पुढे सरसावतो तसंच आपल्या चुकांची जबाबदारीही आपणच स्वीकारावी त्यासाठी देवाला दोष देऊ नये.....
आनंद....सगळ्यांना हवा असणारा. उभं आयुष्य आपण आनंदाच्या शोधात असतो. मिळेल तिथून मिळेल तेवढा आनंद आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण हा आनंद कायम आपल्या मनात साठवण्याची काही सोय नसते, म्हणून तरी ठीक आहे नाहीतर छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा सर्वसामान्यांचा आनंद स्वीस बँकेत जमा झाला असता !!! मिळालेल्या गोष्टीत आनंदी राहण्याचा स्वभाव बनवला तर आपण जास्त काळ आनंदी राहू शकू नाहीतर अधिकाधिक मिळवण्याच्या हव्यासापोटी आपली सुद्धा हात लावील त्याचे सोने करणाऱ्या मिडास राजासारखी अवस्था होऊन जाईल आणि जीवन ओसाड होऊन जाईल...म्हणून मिळाले तेवढ्यात समाधानी राहून त्यातून मिळणारा आनंद उपभोगायला पाहिजे.....
हल्ली राजकारणात आपला प्रभाव दाखवण्यासाठी कोणता नेता काय शक्कल लढवील सांगता येत नाही, पक्षनिष्ठा ते पक्षातून निसटा असा आपल्या लोकशाही नेत्यांचा राजकीय प्रवास होऊन झाला आहे. सत्ता नाहीतर पद मिळवण्यासाठी डावे उजव्यांच्या मागे,तर कधी उजवे आपल्या सोबत्यांच्याच हात धुवून मागे लागलेले दिसतायत !!! कोणत्याच विकासाच्या मुद्द्यावर एकत्र न येणारी हि मंडळी मात्र फायद्याच्या मुद्द्यावर लगेच एक होतात !!! एका पक्षात हा फायदा मिळत नसेल तर मग लगेच तळ्यातून मळ्यात उडी मारायला वेळच लावत नाहीत मग काही 'भाव' खुर्चीच्या स्वप्नाशी तडजोड स्वीकारली जात नाही !!!
आजकाल एका मोठ्या नेत्यामागे कार्यकर्त्यांची फौज दिसते, ते स्वतःला त्यांचे पाठीराखे समजतात, त्यांचा नेता भलेही त्यांना उजवाच काय पण डावा हातही समजत नसेल पण त्यांच्याशी यांची स्वयंघोषित जवळीकता नेत्याच्या पेक्षाही जास्त अखड कार्यकर्त्यांच्याच अंगात आणते!!! मग काय कार्यकर्ते नेत्याच्याच गरमीत आणि गुर्मीत बोलत सॉरी आदेश सोडत सुटतात !!! हा अनुभव तुम्हालाही नक्कीच आला असेल.
दररोज लोक सकाळी स्नान करून देवदर्शन करतात. सगळ्या अंगाला गंध भस्म लावतात, ग्रंथ वाचतात पण हे सगळे सोपस्कार म्हणजे भक्ती असा त्यांचा कयास असतो पण नुसता दिखाऊपणा करायचा आणि माणुसकी विसरून माणुसकीला लाजवणारी कामे दिवसभर करायची हा विरोधाभास जगायचा ही विसंगती आपल्या तर्काला पटणारी नाही. त्यापेक्षा माणसातला देव ओळखून आपल्या अंतरात इतरांप्रती असलेला भाव निर्मळ ठेवला तरी पुरेसे आहे असे माझे मत आहे, त्यासाठी रोजच मंदिराच्या पायऱ्या झीजवायची सुद्धा काही गरज नाही.....
स्वार्थाने बरबटलेल्या या जगात चांगलेही लोक काही कमी नाहीत. पण त्या चांगुलपणाची त्यांना चांगलीच किंमत मोजावी लागते, या किमतीच्या अदायगीसाठी पराकोटीची हिम्मत लागते. सगळेजण त्या चांगुलपणाचा फायदा उचलायला तर सरसावून पुढे होतात पण जेव्हा काम निघून गेलेले असते तेव्हा मात्र त्यांना या चांगल्या लोकांची साधी आठवण सुद्धा येत नाही !!! किती कमालीचे जग आहे हे ! लोक चांगली कामं करण्याचा मनोभावे संकल्प करतात आणि मग त्याची किंमत मोजायची वेळ आली कि मात्र मग पळ काढतात !!! असो, चांगुलपणात स्वतःचा बळी देणाऱ्या पण आपला भोवतालचा अंधार हटवणा-या दिव्याच्या वातीची हिम्मत पहा नं,
हे जीवन निरतिशय सुंदर आहे, त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या अनेकांनी केल्या पण तेवढ्यामध्ये मर्यादित होईल ती जीवनाची संकल्पना कसली ? ह्या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करणारे, जिंदगी कैसी ही पहेली म्हणणारे आणि जीना इसी का नाम है म्हणणाऱ्या प्रत्येकाला या जीवनाचा जिवंत साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपापल्या रचनांमध्ये तो व्यक्त करण्याचा प्रयत्नदेखील केला...पण मला वाटतं या जीवनाचा अर्थ कुणालाही तेव्हा कळतो जेव्हा ते अत्तराच्या कुपीतल्या अत्तराप्रमाणे भुर्रकन उडून जाण्याच्या तयारीत असते....
शब्द...भावना व्यक्त करण्यासाठीचं माध्यम..परंतु हे माध्यम जितकं सोपं , सहज तितकंच ते घातक आणि भयंकर सुदधा ठरतं !!! दुखऱ्या मनाच्या वेदना शमवणारे हेच शब्द कधी कुणाच्या मनोवेदनेचे कारण बनतात, त्यांना जशी भावनेची ओल असते तशीच त्यांना काळीज कापणारी तीव्र धार सुद्धा असते म्हणूनच म्हणतात, ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकले !!!
आजकाल कोणासाठीही कुणाकडे जरासुद्धा वेळ नाही. प्रत्येकाने आपापल्या विश्वाभोवती कुंपण लाऊन घेतले आहे. हा मर्यादितपणा, संकुचितपणा या नव्या जगाचा नवा कायदा होऊन गेला आहे. पण असं बंदिस्त होऊन चौकटीत राहणे पटत नसणाऱ्या आपल्यासारख्याचं काय ??? तर तो आपला स्वभावदोष आहे...आपल्यालाच या नव्या पद्धतीत राहणे पसंत नाही....म्हणून असे जग अशा लोकांनाच लख लाभ असो...आपल्या ला जे जमत नाही ते जमतच नाही...काय करणार ?????
असं म्हणतात प्रेमापुढे भल्याभल्यांना झुकावं लागतं, आणि ते खरंही आहे. ढग एवढे उंचावरून जातात पण धरणीची साद त्यांना बरसायला भाग पडते, माणूस मग तो एखादा पहिलवान जरी असला तरी तो त्याच्या लहान मुलाने हाताला धरून खाली बसवले तरी चित् झाल्यासारखा खाली पडतो !!! ही ताकद बाहूंची नसते तर प्रेमाची असते . सृष्टीतही अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात..आता क्षितीजाचच पहा ना,
प्रवासात असंख्य अनोळखी चेहरे भेटतात...आपले नसूनही ते आपले वाटतात...कधी कधी तर आपण त्यांना आधी कुठेतरी भेटल्याचा भास होतो...आणि कधी कधी तर हे अनोळखी अपरिचित असूनही जवळ बसून जवळचे होतात आणि वाटतं की ज्यांना आपण आपले म्हणून जवळीक करायला जातो ते कधीच मनाने आपले होत नाहीत...सुरक्षित अंतर ठेवून राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात...अशावेळी मला वाटतं....
पाऊस....मनातला मन भरून बरसणारा आणि मन भरून आणणारा...पावसाचा आणि जुन्या आठवणींचा संबंध तसा जास्तच जवळचा....ढग दाटून येतात तशा आठवणीही दाटतात...वाऱ्याच्या झुल्केनेही ढग जसा झरतो तसंच मन भरून आलेलं असलं की डोळ्यांनाही धार लागते...का हा पाऊस नेहमीच एवढा आपला एवढा जवळचा वाटतो ??? का कुणास ठाऊक ? त्याचं आपल्याशी एक शब्दातीत नातं असतं....ते नातं म्हणूनच पावसाची वाट आतुरतेनं पाहायला लावतं.....![]() |