डोक्यानेच विचार करू नये
कधी मनालाही वाव द्यावा,
गणिती हिशेब बाजूला ठेवून
भावनांनाही भाव द्यावा....
मन एक अगम्य,अथांग,अकल्प्य आणि अतर्क्य असा विषय...या मनाचा एक आवाज नेहमीच मला ऐकू आलेला...त्याला कुणी श्रीकृष्णाच्या वेणूचे नाव दिलं तर कोणी मीरेची प्रेमधून म्हटलं,कुणाला विश्वाचे आर्त वाटला हा आवाज तर कोणाला सत्यम शिवं सुंदरम चा आभास जाणवला याच आवाजात... आणि तोच हा आपल्याच अंतरातून ध्वनित होणारा....'अंतर्नाद'.
प्रेमाच्या विश्वातल्या संकल्पना आणि गणित काही तरी औरच!!! भूमिती मध्ये एकरूपता नावाचा एक प्रकार असतो, त्यात काही ठराविक रेषा काही रेषांची आणि काही कोन काही कोनांशी एकरूप असतात पण प्रेमाच्या भूमितीतही ही एकरूपता प्रकर्षाने जाणवते. तो आणि ती दोघे एकमेकांना अनुरूप असले की मग ते एकरूप होतात.आणि इतके एकरूप होतात की अगदी एकरूप होतात. प्रेमाच्या या गणितात बेरीज आणि वजाबाक्याही अशाच काहीशा सारख्या काहीश्या वेगळ्या... प्रेमाच्या बेरजेत एक तो आणि एक ती मिळून दोन हे उत्तर येत नाही तर उत्तर एकच येते आणि वजाबाकीत दोघांपैकी एकजरी दुसऱ्याला सोडून गेला तर मात्र उत्तर शून्य येते म्हणजे बाकी काही शिल्लकच राहत नाही..!!! सगळं काही संपून जातं.
आपले डोळे आपल्याला जे दाखवतात ते आणि तेवढेच आपण बघतो अन तेच सत्य तेच खरे असे आपण मानतो. पण बऱ्याचदा हे डोळे आपली बेमालूम फसवणूक देखील करतात, मग आपण म्हणतो माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नाही..! म्हणून नेहमीच डोळ्यांवर १०० टक्के विश्वास कधीच टाकू नये ? दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी असतातच असे नाही आणि असणाऱ्या सगळ्या गोष्टी दिसतीलच असेही नाही. क्षितीज डोळ्यांना दिसते, मृगजळ डोळ्यांना दिसते पण मुळात ते अस्तित्वात असत नाही, आणि परमेश्वर, आपली बुद्धी दिसत नाही पण म्हणून काय आपण त्यांचे अस्तित्व नाकारू शकतो का ? एकवेळ परमेश्वराचे अस्तित्व नाकारणारे बुद्धीजीवी भेटतील पण बुद्धी आहे हे तेही नाकारू शकणार नाहीत. म्हणून नजरेच्या भूल भुलैयात कधी तर्काची साथ सोडू नये ...
अनादिकालापासून मानवी मन आणि मोह यांचा घट्ट संबंध आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या बायबल मधल्या अॅडम आणि इव्ह यांच्या कथेत मोहाचे ते फळ खाण्यासाठी मनाई केलेली असतानाही इव्ह ते फळ खाते आणि तेंव्हापासून दुःखास जबाबदार होतात. रामायणात वनवासात असतांनाही सीतेला एक राजकन्या आणि एक राज पत्नी असूनही एका सोन्याच्या हरणाचा मोह झालाच आणि पुढचे रामायण घडले, महाभारतात आपल्याला सत्ता मिळावी या मोहापायी दुर्योधनाने आपल्या कुलाचा विनाश ओढवून घेतला या सगळ्या उदाहरणांतून एकच गोष्ट समजते ती म्हणजे मानवी मन आणि मोह यांच्यात एक घटत वीण असलेले नाते आहे तेच नाते चारोळीतून व्यक्त करण्याचा मोह मलाही आवरता आला नाही...काय करणार मीही एक माणूसच आहे ना...!!!
आपल्याला जगात येतांना डोळे मिळालेले असतात पण त्या डोळ्यांनी आजूबाजूच्या जगाचे केवळ अवलोकन करता येते पण खरी दृष्टी मात्र देते ती आपली आई, जगातली सगळ्यात प्रथम वंदनीय गुरु. त्यानंतर शिक्षण देऊन आपल्या नजरेला विश्वात विखुरलेले ज्ञानकण आपल्या प्रकाशातून दृश्य स्वरुपात दाखवणारे आपले शिक्षक आपले गुरु ते आपल्या नजरेला अस्तित्वात असतांनाही न दिसू शकणारे अणु रेणू जसे एखाद्या खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाच्या झरोक्यात दृश्यमान होतात तसा ज्ञानाचा प्रकाश प्रदान करतात अन आपले जीवन उजळून काढतात, त्यांच्याच कृपा प्रसादामुळे आपल्या चित्तास एकाग्रता आणि शांतता प्राप्त होते आणि धकाधकीच्या आजच्या जीवन शैलीतून काही काळासाठी शिथिलता प्राप्त होते...आज गुरुपौर्णिमा...गुरूंच्या कृपेचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस...त्यांच्या ऋणातून मुक्त होणे तर निव्वळ अशक्य !!! पण निदान आपण कृतज्ञता तरी व्यक्त करणे आपले आद्यकर्तव्य आहे म्हणूनच त्यांच्या चरणी माझी आजची चारोळी...
प्रणय आणि पाऊस यांचा संबंध अगदी कालिदासाच्या मेघदूत पासून, मर्ढेकरांच्या कवितांपर्यंत आणि ग्रेस पासून संदीप खरेपर्यंत सगळ्यांनाच आपल्या मोहिनीत कैद करणारा. या पावसाच्या बरसण्याचा आणि प्रेमिकांच्या भेटीच्या ओढीने तरसण्याचा जो शृंगारिक भाव या सगळ्यांच्या काव्यातून उमटला तो केवळ अप्रतिमच ! पण या प्रतिभेला प्रेरणा देणारा पाऊस आणि त्या पावसातली त्या दोघांची चिंब भेट खरच खूप रोमांचक. अगदी आयुष्यात आलेल्या आणि येणाऱ्या सगळया पावसाळ्याच्या ऋतूंत पुरेल एवढी रोमांचाची शिदोरी देणारा तो क्षण... आजपर्यंत सगळ्याच कवी मनांना लिखाणाची प्रेरणा देतो...
कधी कधी आपलं आवडतं माणूस समोर असूनही डोळे मात्र त्याला मनात साठवून घेण्यासाठी आसुसलेले असतात. मग सगळ्या जगाचा चक्क विसर पडतो. फक्त आणि फक्त मग त्याच्या \ तिच्या डोळ्यात स्वतःचा शोध घेण्याचा खेळ !!! या खेळात आपण इतके रमून जातो की मग आपण आपल्यापासून खुपच दूर निघून जातो, मग परत जागेवर यायला मात्र वाटच सापडत नाही, पण हा शोधण्याचा आणि हरवण्याचा खेळ खेळण्यात एक वेगळीच गम्मत असते.
अश्रू आणि वेदना या तशा दोन भिन्न बाबी पण त्यांच्यात एक सारखेपणा असा की त्यांच्या असण्यात कधीच काही फरक पडत नाही. वेदना ही कधीच सुखद असू शकत नाही आणि अश्रू कधीच गोड असू शकत नाहीत. मग वेदना प्रेमळ माणसाकडून मिळालेली असो नाहीतर अश्रू आनंदात निघालेले असोत !!! या अश्रूंचं आणि वेदनेचं एक अनामिक पण अतूट असं नातं आहे, शरीर असो वा मन वेदना होताच अश्रू अगदी सहज बाहेर पडतात. जणू काही तशी व्यवस्थाच असते...काही जन म्हणतील की आनंदात सुद्धा अश्रू येतात ना मग वेदनेशी अश्रूंचं अतूट नातं कसं काय ? तर पहा असं म्हणणा-या लोकांसाठी हे उत्तर...